सेलू : येथील पोलिसांच्या पथकाने पहाटे जामणी येथील पारधी बेड्यावर वाॅश आऊट मोहीम राबवित तब्बल 6 लाखांचा गावठी दारुचा साठा जप्त केला. पोलिसांनी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या धडक कारवाईमुळे दारुविक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येवून ठेपला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सेलू पोलिसांच्या वतीने रविवारी 13 मार्च रोजी पहाटे पाच वाजता जामणी परिसरातील पारधी बेड्यावर धाडसत्र राबविले.
यावेळी 4 लाख 80 हजार रुपयांचा 9 हजार 600 लिटर कच्चा मोहरसायन सडवा, 24 हजार रुपये किमंतीचे 48 खाली ड्रम, दारु गाळपासाठी वापरण्यात येणारे 22 हजार रुपयांचे 22 काळे ड्रम, दारू गाळपासाठीचे 28 हजारांचे साहित्य, 24 हजारांची 225 लिटर गावठी दारू, असा एकूण 6 लाख रुपयांचा गावठी दारुसाठा जप्त करण्यात आला. यासोबतच वर्षानिमित्त पवार हिच्या घरझडतीत चार डबक्यातील 85 लिटर तसेच जयशिला प्रवीण पवार हिच्या घरझडतीत 80 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोघींवरही कारवाई करण्यात आली.