ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतीतील 84 पदासाठी होणार निवडणूक


वर्धा : निधन, राजीनामा अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्राम पंचायत सदस्य पदाच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. ग्राम पंचायतीतील रिक्त पदांच्या पोट निवडणूका पारंपारिक पध्दतीने होणार असून 21 डिसेंबर मतदान होणार आहे.

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणुन अधिसुचित करण्यासाठी पुर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसुचनेमध्ये 22 नोव्हेंबर पर्यंत सुधारण करण्यात येईल. तहसिलदार 22 डिसेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करेल. नामनिर्देशनपत्रे 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सादर करता येईल.

नामनिर्देशनपत्राची 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पासुन छाननी करण्यात येईल. नामनिर्देशनपत्र 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पर्यंत मागे घेता येईल. याच दुपारी 3 वाजता पासुन निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवाराची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि.21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. दि.22 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि.27 डिसेबरला निवडणूकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिध्द करण्यात येईल.

जिल्हयातील वर्धा तालुक्यातील 5, सेलू- 15, देवळी 12, आर्वी 19, आष्टी -7, कारंजा 12, हिंगणघाट-6 व समुद्रपूर -8 अशा रिक्त असलेल्या 84 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here