साखळी उपोषणाचा ४० वा दिवस! पेट्रोलपंप हटविण्याची समता सैनिक दलाची मागणी

वर्धा : वर्धा जिल्हा पेट्रोलपंप हटाव कृती समितीतर्फे साखळी उपोषणाचा मंगळवार २५ ऑक्टोबर हा ४० वा दिवस आहे. साखळी उपोषणातून कृती वहन समितीच्या समता सैनिक दल, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सरकार, जिल्हाधिकारी- पोलिस प्रशासन तसेच खासदार, आमदार व पालकमंत्री यांचा तीव्र निषेध केला आहे.

सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजबळ सिव्हिल लाईन, वर्धा येथे समता सैनिक दलाचे सुरक्षाप्रमुख प्रदीप कांबळे, तालुका संघटक मनोज थुल, राकेश डंभारे, पप्पू पाटील, अमोल ताकसांडे, अनिल लोखंडे, बाळू धपके, विकी वागदे, दीपक हुके, प्रवीण नाबाडे आदीं उपोषणाला बसले होते. जिल्हा पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या वतीने सरकार-शासन व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात दररोज साखळी उपोषण सुरु आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून पोलिस वेल्फेअरच्या पेट्रोलहपंपाची जागा स्थलांतरित करण्यात यावी, ही प्रमुख मागणी आहे.

भारतीय संविधान जिंदाबाद, पोलिस प्रशासन वेल्फेअरचा पेट्रोलपंप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळून हटलाच पाहिजे, अशा घोषणा देऊन जिल्हाधिकारी-पोलिस प्रशासन, महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे यांचा सर्व सहभागी आंबेडकरी व पुरोगामी संघटना कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला.

पालकमंत्र्यांचा केला निषेध

पेट्रोलपंप हटविण्यासाठी मागील ४० दिवसांपासून आंदोलन सुरू असले तरी अद्याप पालकमंत्र्याकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सुनील केदार यांचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here