जावयाकडून सासूचा विनयभंग! पोलीस पत्नीसही मारहाण; पोलिसात तक्रार दाखल

सिंदी (रेल्वे) : जावयाने सासूचा विनयभंग करून पोलीस पत्नीलाही मारहाण करीत शिवीगाळ केली. ही घटना पोलीस वसाहतीत घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विशाल अडसळ याचा विवाह पोलीस दलात कार्यरत युवतीशी झाला होता. मात्र, लग्नानंतर विशाल हा विवाहितेस त्रास देऊ लागल्याने विवाहिता ही पोलीस वसाहतीत एकटी राहू लागली. सायंकाळच्या सुमारास विशालची सासू घरी असताना विशाल याने घरात प्रवेश करून सासूला तू माझ्या विरोधात नोटीस का पाठविली असे म्हणून ओढताण करीत विनयभंग केला. याला विरोध केला असता त्याने मारहाण केली. दरम्यान, विशालची पत्नी समजाविण्यास आली असता तिलाही मारहाण केली. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सध्या महिला व मुलींवरील अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटना जिल्ह्यात वाढत चालल्या आहेत. याला विकृत मानसिकता कारणीभूत ठरली असून नागरिकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच पोलिसांनी देखील अशा विकृतांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here