विळा मारून केली निर्घृण हत्या! दोन गटात हाणामारी

सेलू : तालुक्‍यातील घोराड येथे शनिवारी सायंकाळी आपसातील वादातून दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत आरोपीने विळ्याचा वापर करून वसंता पोहाणे (४२) रा.घोराड याच्यासह त्याच्या साथीदारांवर हल्ला केला. यात वसंता पोहाणे याचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत.

आपसातील वादातून घोराड येथील विजय नथ्थूजी तेलरांधे यांच्या घरावर वसंता पोहाणे व त्याच्या सहा ते सात साथीदारांनी हल्ला केला. सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरू असतानाच, वादाचे हाणामारीत रूपांतरण झाले. हाणामारीच्या दरम्यान विजय याने वसंता, तसेच विजयच्या साथीदारांवर विळ्याने हल्ला चढविल्याने, काहींनी घटनास्थळावरून धूम ठोकली. यात वसंता हा गंभीर जखमी झाला, तर वसंताचे दोघे साथीदार जखमी झाले.

गंभीर जखमी वसंता याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालविली. हत्येची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, सेलूचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.

या प्रकरणी सेलू पोलिसांनी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोहळे, अखिलेश गव्हाणे, अनिल भोवरे, सचिन वाटखेडे, नारायण वरठी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here