

वर्धा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी मनीष अवचित चवाटे (३०) रा. समतानगर वर्धा यास जिल्हा न्यायाधीश-२ आर. व्ही. आदोने यांनी पाच वर्षांच्या दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
पीडिता ही घरासमोर खाटेवर बसून असताना आरोपी मनीष याने तेथे येत पीडितेला रेल्वे सुरक्षा भिंतीच्या मागे नेले. तेथे मतिमंद मुलीवर आरोपी अत्याचार करीत असताना पीडितेच्या घराशेजारील मुलीस हा प्रकार दिसल्याने तिने आरडा-ओरड केली. त्यामुळे पीढितेच्या आईसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांची गर्दी होत असल्याचे लक्षात येताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला, पण काही नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेत त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक यु व्ही. देवकर यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू जिल्हा सरकारी वकील गिरीष व्ही. तकवाले यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार नरेंद्र भगत यांनी काम पाहिले. या प्रकरणी न्यायालयात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले.
दोन्ही बाजूचा युक्तीवाद तसेच पुरावे लक्षात घेवून न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी मनीष चवाटे याला भादंविच्या कलम ३६३ अन्वये एक वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास, बाल ठैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कळम १० नुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्याचा साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. शिवाय कलम 3५७ फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार नुकसान भरपाई म्हणून रक्कम 3 हजार रूपये पीडिताला देण्याचा आदेश दिला आहे.