Home Breaking News खोल विहिरीतून मादी बिबट्याने दोन पिल्लांना केले सुरक्षित मुक्‍त

खोल विहिरीतून मादी बिबट्याने दोन पिल्लांना केले सुरक्षित मुक्‍त

कारंजा (घा.) : तालुक्‍यातील सुंसुदरा गावापासून जवळच असलेल्या जंगलव्याप्त परिसरातील कार नदी प्रकल्पाच्या कालव्यामध्ये सोमवारी बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. कालव्याचे पाणी वेगाने वाहून जाण्यासाठी तिथे सुमारे १० फूट खोल विहीर आणि 3 फूट व्यासाचे मोठे पारूइप बसवण्यात आले आहेत. याच विहिरीमध्ये अंदाजे एक महिना वयाची बिबट्याची दोन पिल्ले अडकली होती. दोन-तीन दिवसांपूर्वीच ही पिल्ले स्थानिक गुराख्यांना दिसली होती; परंतु ती नेमकी कोणत्या प्राण्याची आहेत हे स्पष्ट झाले नव्हते. वन कर्मचारी मीनाक्षी ढोके यांनी या जागेची पाहणी केली असता, तेव्हा तिथे काहीच आढळले नव्हते. मात्र, काल ती पिल्ले विहिरीतून बाहेर येण्यासाठी तळमळत असल्याचे गुराख्याच्या निदर्शनास आले.

ही बातमी सुंसुदरा गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. लोकांच्या गर्दीमुळे मादी बिबट आसपासच कुठेतरी दडून बसल्याचा संशय व्यक्‍त होत होता. संध्याकाळी अंधार पडल्यावर गदी अशी ओसरू लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने घटनास्थळी देखरेखीसाठी कॅमेरे लावले. वन कर्मचारी रात्री १२ वाजेपर्यंत तिथेच पाळत ठेवून होते. सुरक्षेच्या कारणास्तव रात्री उशिरा कर्मचारी घटनास्थळापासून १५० मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या वाहनात जाऊन थांबले. आज सकाळी कॅनॉल विहिरीची तपासणी केली असता, तिथे पिल्ले आढळून आली नाहीत. रात्रीच्या अंधारात मादी बिबट्याने विहिरीतील गोल पाड़पच्या मदतीने आपल्या दोन्ही पिल्लांना सुरक्षितस्थळी नेल्याचा अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्तविला आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांपासूत होते लक्ष

जंगलव्याप्त परिसरातील कालव्या खोल विहिरीत दोन पिल्ले असल्याची माहिती गुराख्याने दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावर पाळत ठेवली होती. दोन्ही पिल्ले बिबट्याची असल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली. पण, सुदैवाने मादीने हल्ला केला नाही अशातच कॅमेरे लावल्यानंतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पिल्ले घेऊन मादी निघून गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!