Home ◼️ संपादकीय आधार प्रमाणीकरण बंधनकारक ; तरच मिळणार ‘अहिल्यादेवी होळकर योजना’ कर्जमाफी !

आधार प्रमाणीकरण बंधनकारक ; तरच मिळणार ‘अहिल्यादेवी होळकर योजना’ कर्जमाफी !

वर्धा : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेनुसार थकीत कर्जदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले असून, प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच लाभ वितरित केला जाणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून, कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. थकीत कर्जामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न या योजनेतून करण्यात येत आहे. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देऊन आर्थिक शिस्त कायम ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेती क्षेत्राला बळकटी देणे आणि उत्पादन क्षमतेत वाढ करणे हेही या योजनेचे उदिष्ट आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याबरोबरच ग्रामीण अर्थ व्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. शासनाने लाभार्थ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली असून, संबंधित विभागांकडून माहिती पडताळणीचे काम सुरू आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

या योजनेत थकीत कर्जदार आणि नियमित कर्जदार अशा दोन्ही घटकांचा विचार करण्यात आला आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक ताण कमी होईल आणि नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होईल. तर, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यामुळे वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळून आर्थिक शिस्त टिकून राहण्यास मदत होईल.

आता आधार प्रमाणीकरण करणे असणार बंधनकारक

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाची पडताळणी आवश्यक आहे. बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास किंवा प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यास कर्जमाफी अथवा अनुदानाचा लाम मिळणार नाही. बनावट लाभार्थी टाळण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने ही अट लागू केली आहे.

कसे कराल प्रमाणीकरण ?

शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. बायोमेट्रिक किंवा ओटीपीच्या माध्यमातून ही पडताळणी करता येते. मोबाइल क्रमांक आधारशी लिंक असल्यास प्रक्रिया सोपी होते. तसेच, कर्ज खात्याशी आधार लिंक असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून लाभ खात्यात जमा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!