
पवनार : येथील मामा-भांजा दर्ग्याजवळ आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून अन्य एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी महामार्गावर वाहतुकीची वर्दळ सुरू असताना मामा-भांजा दर्गा परिसरात दोन दुचाकी अचानक समोरासमोर आदळल्या. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनचालक रस्त्यावर फेकले गेले. अपघात होताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला प्रथम स्थानिक पातळीवर प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. मामा-भांजा दर्गा परिसरात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या मार्गावर वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित अंतर ठेवा आणि वेगावर नियंत्रण ठेवा, असे आवाहनही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

























































