Home ◼️ संपादकीय अवैध दारू विक्रीला कोणाचा वरदहस्त ? खुलेआम विक्रीने महिलांचा संताप ; फलक...

अवैध दारू विक्रीला कोणाचा वरदहस्त ? खुलेआम विक्रीने महिलांचा संताप ; फलक लावत प्रशासनाचे वेधले लक्ष

सेलू : “गावात दूधापेक्षा दारू सहज मिळते” असा संतप्त सवाल करणारा फलक सध्या बोरी गावात चर्चेचा विषय ठरत आहे. एका बाजूला शासन दारूबंदी, व्यसनमुक्ती आणि युवकांच्या भविष्याबाबत मोठमोठ्या घोषणा करीत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा अक्षरशः महापूर आला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. बोरी गावातील महिलांनी थेट जनजागृतीपर फलक लावून गावातील बिकट परिस्थिती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

गायीचे दूध ५० रुपये प्रतिलिटर मिळते; पण दारू १५० रुपये लिटर दराने २४ तास उपलब्ध होते, असा उल्लेख असलेल्या फलकामुळे गावात खळबळ उडाली आहे. माँ दुर्गा बचतगट महिला मंडळाच्या पुढाकारातून लावण्यात आलेल्या या फलकाने प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महिलांच्या मते, गावात अवैध दारू विक्री इतकी वाढली आहे की युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत. अनेक कुटुंबांमध्ये रोज वाद, मारहाण, आर्थिक संकट आणि सामाजिक तणाव निर्माण होत आहे.

गावातील महिलांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, काही दिवस कारवाईचे आश्वासन दिले जाते आणि नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. गावोगावी आता खुलेआम दारू विक्री सुरू असून, काही ठिकाणी तर दिवस-रात्र सहज दारू उपलब्ध होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागात बेरोजगारी, आर्थिक अडचणी आणि व्यसनाधीनतेमुळे युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे. अनेक तरुण दिवसाढवळ्या दारूच्या आहारी जात असून, त्यामुळे कुटुंबातील महिलांवर मानसिक व आर्थिक ताण वाढत आहे. काही कुटुंबांमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनाही वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासन व्यसनमुक्ती अभियान राबवते; पण प्रत्यक्षात गावात अवैध दारूचा धंदा तेजीत सुरू आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

विशेष म्हणजे, काही गावांमध्ये पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या नाकावर टिच्चून अवैध दारू विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या धंद्याला कोणाचा वरदहस्त आहे का, अशीही चर्चा रंगू लागली आहे. महिलांनी लावलेल्या फलकामुळे आता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, या फलकाची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. युवकांचे भविष्य अंधारात जात आहे. गाव दारूमुक्त व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अवैध दारू विक्रीवर मोठी मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

दारू सहज, दूध दुर्मिळ!

गावात दूध विकत घेण्यासाठी नागरिकांना शोधाशोध करावी लागते; मात्र अवैध दारू काही मिनिटांत उपलब्ध होते, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्रीचे अड्डे वाढत असून, युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या गर्तेत ओढले जात आहेत. यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडत असून महिलांवर अत्याचार आणि आर्थिक संकट वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!