Home ◼️ संपादकीय ‘भीम जयंती’ चित्रपटाला ‘बेस्ट सोशल फिल्म’ पुरस्कार ; कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये...

‘भीम जयंती’ चित्रपटाला ‘बेस्ट सोशल फिल्म’ पुरस्कार ; कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ध्याच्या ‘उमेश क्रिएशन’चा गौरव

वर्धा : कोल्हापूर येथे पार पडलेल्या ‘कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ (KKIFF) मध्ये वर्ध्याच्या ‘उमेश क्रिएशन अँड फिल्म्स’ निर्मित ‘भीम जयंती’ या मराठी चित्रपटाला ‘बेस्ट सोशल फिल्म – महाराष्ट्र २०२६’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक विषयावरील प्रभावी मांडणीमुळे चित्रपटाला हा सन्मान मिळाला. बुधवारी (ता. २७) आयोजित दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. चित्रपटाचे निर्माते उमेश म्हैसकर असून, या यशामुळे वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

‘भीम जयंती’ चित्रपटाने सामाजिक आशय, वास्तवदर्शी कथानक आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर परीक्षकांची विशेष दाद मिळविली. समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या चित्रपटाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या पुरस्कार सोहळ्यास प्रसिद्ध गीतकार सुधाकर शर्मा, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी, तसेच कोल्हापूरचे लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आनंद कोष्टी उपस्थित होते.

या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन महादेव साळुंखे यांनी केले होते. त्यांच्या नियोजनामुळे महोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान, या सोहळ्यासाठी वर्ध्यातून वर्षा म्हैसकर, यशवंत भांडेकर, उज्वला भांडेकर, प्रशांत तोतला, तुकाराम शिंदे, मनीष तराळे आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाला मिळालेल्या या यशाबद्दल निर्माते उमेश म्हैसकर व त्यांच्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!