
हिंगणघाट: पावसाळा तोंडावर आला की, सखल भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तुंबणारे पाणी आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. मात्र, यंदा हिंगणघाट नगर परिषद प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात स्वच्छता आणि मान्सूनपूर्व कामांचा जोरदार धडाका लावला आहे.
नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर आणि स्वच्छता व आरोग्य सभापती संजय माडे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे स्वास्थ्य अधिकारी विशाल ब्राह्मणकर, स्वास्थ्य निरीक्षक नारायण दांडेकर, विजय खोब्रागडे, अविनाश चव्हाण यांच्या नियोजनाखाली स्वच्छता विभागाने शहरात धडक मोहीम राबवीत मुख्य नाल्यांची आणि ड्रेनेज लाईनची सफाई युद्धपातळीवर सुरू केली आहे.दरवर्षी पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचण्याच्या तक्रारी येत असतात. हीच बाब गांभीर्याने घेत स्वच्छता व आरोग्य सभापती संजय माडे यांनी यंदा पावसाळ्याच्या महिनाभर आधीच संपूर्ण शहराचा आढावा घेतला.
कुठे कचरा अडकला आहे, कुठे नाल्याची रुंदी कमी आहे, याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांनी एका चोख आणि नियोजनबद्ध आराखड्याची आखणी केली. केवळ कागदावर नियोजन न ठेवता, स्वतः मैदानात उतरून त्यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेतले आणि शहरातील वर्षानुवर्षे गाळाने भरलेले मोठे नाले पूर्णपणे मोकळे केले. त्यांच्या या अचूक नियोजनामुळे आज शहरातील नाले प्रवाही झाले असून, पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय पाठबळ आवश्यक असते. आमदार समीर कुणावार आणी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी या संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवले आहे. कामासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि निधी वेळेत उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. यंदाच्या पावसाळ्यात नागरिकाच्या घरात पाणी शिरणार नाही आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, याच उद्दिष्टाने स्वच्छता विभाग काम करत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने एकूण ४ प्रमुख भागांमध्ये या कामांची विभागणी केली आहे. जेसीबी व पोकलेन या यंत्रसामग्रीद्वारे मुख्य नाले साफ केले जात असून, काढलेला मलबा त्वरित उचलण्यासाठी ३ ट्रॅक्टर आणि टिप्पर तैनात करण्यात आले आहेत.
जेथे यंत्रे पोहोचू शकत नाहीत, अशा जुनी वस्ती व नवीन वस्तीमधील सर्व प्रभागांतील अंतर्गत लहान नाले नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत साफ केले जात आहेत, जेणेकरून गल्लीबोळांतील पाण्याचा निचरा वेगाने होईल.शहरातील मुख्य ड्रेनेज लाईन चोकअप होऊ नये म्हणून उपलब्ध दोन जेटींग मशीनद्वारे मुख्य मलजल वाहिनी साफ केली जात आहे.नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी शहरात २ मशीनद्वारे प्रभागनिहाय जंतुनाशक धुरळणीची (फॉगिंग) मोहीम वेगाने सुरू आहे. भविष्यात एसटीपी प्लांट आणि कचरा संकलन केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा स्वच्छता विभागाचा मानस आहे. नेहमी पावसाळा आल्यावर जागी होणारी यंत्रणा यंदा मात्र पावसापूर्वीच सज्ज आणि ॲक्शन मोड मध्ये दिसल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नियोजनबद्ध काम सुरू….
हिंगणघाट शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बनविण्यासाठी आमदार समीर कुणावार हे सातत्याने प्रयत्नरत आहेत. त्यांच्या याच दूरदृष्टीला आणि संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी हिंगणघाट नगरपरिषद पूर्णपणे कटिबद्ध आहे. यंदा पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही महिनाभर आधीच प्रत्यक्ष मैदानात उतरून नियोजनबद्ध काम सुरू केले आहे.
प्रतिक्रिया….
मुख्य नाल्यांपासून ते गल्लीबोळांतील लहान नाल्यांपर्यंत सर्वत्र युद्धपातळीवर सफाई सुरू आहे. आमदार महोदयांच्या मार्गदर्शनात शहराचा विकास साधतानाच, हिंगणघाटकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आमची प्राथमिकता आहे.
-संजय माडे, सभापती, स्वच्छता व आरोग्य समिती, नगर परिषद, हिंगणघाट.
























































