

वर्धा : अंमली पदार्थांच्या विरोधात जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समुद्रपूर तालुक्यात गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस रंगेहाथ पकडले. या कारवाईत २ किलो १५१ ग्रॅम गांजासह मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३४ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट उपविभागात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा कोरी येथे सापळा रचण्यात आला. या ठिकाणी कमलाकर चिंतामन वावधणे हा गांजाची विक्री करताना पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्याकडून २ किलो १५१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. एमएच ३२ एएम १६२७) व मोबाईलही जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कमलाकर वावधणे याच्यासह त्याला गांजा पुरवठा करणारा शेख अलीम शेख रमजान (रा. आदर्श नगर, नागपूर) या दोघांविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर व अभिषेक नाईक यांचा सहभाग होता.


























































