
कारंजा (घाडगे) : शेतात काम करण्यासाठी बैलबंडीने शेतातून परत येताना अचानक बिबट दिसला. बैल घाबरले, सैरावैरा पळू लागले. अशातच बैलबंडी रस्त्यालगत खोल दरीत पलटी झाल्याने यात दोन्ही बैलांना दोरखंडाची फाशी लागून त्यांचा मृत्यू झाला, तर मुलगा आणि वडील दोघेही जखमी झाले.
ही घटना पारडी येथील गोडाचा माळ परिसरात घडली.
किसना मरसकोल्हे आणि मुलगा सतीश रा. पारडी यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. ते गोडाचा माळ भागातील स्वतःच्या शेतात गेले होते. दुपार १:३० सुमारास परत येत असताना, गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर झुडपात बैलबंडी हाकत असलेल्या सतीशला व बैलांना लपलेला बिबट दिसला. बैल घाबरून पळाले. ५० ते ६० फूट अंतरावर पळाल्यानंतर बैलांनी बंडी रस्त्यातरील खोल दरीत बेभान होऊन नेल्याने बंडी उलटली. यात दोन्ही बैल मृत पावले, तसेच सतीश व किसना हे दोघेही गंभीर जखमी झाले.
दीड लाखाचे नुकसान…
किसना मरसकोल्हे यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून, बैलबंडीच्या भाड्याच्या भरोशावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. या घटनेत शेतकऱ्याचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे गावकऱयांकडून बोलले जात होते. त्यामुळे वनविभागासह प्रशासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील गावकऱ्यांनी केली.




























































