


सेलू : सणासुदीच्या दिवसांत गावागावात वाढलेल्या दारूच्या विक्रीमुळे कायदा आणि सुव्यवस्था ढासळू नये म्हणून सेलू पोलिसांनी अवैध दारू निर्मितीविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मौजा मोहगाव शिवारात शनिवारी पोलिसांनी मोठा छापा टाकून अवैध दारू निर्मितीचा पर्दाफाश केला. या कारवाईत सुमारे ₹४ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघे आरोपी फरार झाले आहेत.
गोपनीय माहितीनुसार, मौजा मोहगाव परिसरात काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात मोहा फुलांपासून हातभट्टीदारू तयार करत असल्याची माहिती सेलू पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभणे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करून पोलीस पोलीस कर्मचारी निरंजन वरभे, तुषार भुते, मंगेश राऊत, तुषार भोंबे, यांच्यासह छापा टाकला. पोलिसांनी मोहगाव शिवारातील दाट झाडीत एकांत स्थळी सुरू असलेली अवैध भट्टी उध्वस्त केली. त्यावेळी आरोपी शंकर पिंपळे (रा. शिवणगाव) घटनास्थळावर दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले. मात्र पोलिस पथक पाहताच आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
छाप्यात पोलिसांनी २०० लिटर तयार दारू, १८ लोखंडी ड्रम मधील ३६०० लिटर मोहा सागवान कच्चा माल, ८ लोखंडी ड्रम, ६ मोठे प्लास्टिक ड्रम, १ विजेची मोटार, ४०० फुट इलेक्ट्रिक केबल, पाइपलाइन व विविध साहित्य असा एकूण ₹४,०४,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळी सर्व दारू व कच्चा माल नष्ट करण्यात आला. आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे ठाणेदार मनोज गभणे यांनी सांगितले.