


वर्धा : “शिक्षण हेच खरं संपत्ती आहे” या तत्त्वज्ञानावर निष्ठा ठेवत आर्वी येथील कार्यरत पोलीस शिपाई भूषण राजेंद्र भोयर यांनी आपल्या शाळेतील एका आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पण हुशार व होतकरू विद्यार्थ्याला दत्तक घेतले आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक सहाय्यापुरता मर्यादित नसून, त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासासाठीचा एक सामाजिक आणि संवेदनशील निर्धार आहे.
भूषण भोयर यांनी यशवंत विद्यालय, येळाकेळी या गावातील शाळेतून शिक्षण घेतले होते. त्याच शाळेच्या आठवणींना साद घालत, या शाळेने मला घडवलं. आता वेळ आहे काहीतरी परत देण्याची, असं म्हणत त्यांनी आपल्या मूळ गावातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सुटू नये आणि ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थीही सक्षम व्हावेत, यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला.
दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके, फी, वहन खर्च आणि इतर आवश्यक साधनसामग्रीसह सर्वतोपरी मदत भूषण भोयर स्वतः करत आहेत. यासोबतच विद्यार्थ्याला वेळोवेळी मार्गदर्शन, करिअर सल्ला आणि मानसिक आधारही दिला जात आहे. या कृतीमुळे एक विद्यार्थ्याचा शैक्षणिक जीवन नुसता सुलभ झाला नाही, तर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संवेदनशील मनोवृत्तीची जाणीवही समाजाला झाली.
या उपक्रमाविषयी बोलताना यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापक वनिता चलाख म्हणाल्या, ही कृती केवळ आर्थिक मदत नाही, तर समाजासाठी एक आदर्श ठरू शकते. अशा उपक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळेल आणि शाळा व समाज यांच्यातील नातं अधिक घट्ट होईल. या कार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्याम वानखेडे यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांनी म्हटले की, अशा संवेदनशील कृती समाजात विश्वास निर्माण करतात. भूषण भोयर यांच्या या पावलामुळे केवळ एक विद्यार्थ्याचे आयुष्य नव्हे, तर अनेकांचे विचारही बदलू शकतात. या संपूर्ण उपक्रमाचं गावात सर्वत्र कौतुक होत असून, भूषण भोयर यांच्या या पुढाकाराला “नव्या समाज परिवर्तनाची सुरुवात” मानलं जात आहे. पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने घेतलेली ही सामाजिक जबाबदारी आजच्या काळात प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.