पोथरा ओव्हर फ्लो! पावसाची संततधार; जलाशयांच्या पातळीत वाढ: वीस गावांचा संपर्क तुटला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वर्धा : गेल्या दोन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी पहाटे सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी दुपारपासून सततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांची पाणी पातळी वाढल्याने नदी-नालेही फुगले आहे. समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने वीस गावांचा संपर्क तुटला. यासोबतच जिल्ह्यातील इतरही जलाशयाची पातळी वाढल्याने पाटबंधारे विभागाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे बुधवारी सायंकाळपासून समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच गेट २५ से.मी. उघडण्यात आले असून त्यातून ६४.२५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नांद प्रकल्पाचीही पातळी वाढल्याने सात गेट ३० से.मी.ने उघडले आहे. पोथरा प्रकल्पात ९५.३० टक्के जल संचय झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला आहे.

आर्वी तालुक्याती निम्न वर्धा प्रकल्पही ७०.६४ टक्के भरल्याने पाटबंधारे विभागाने सायंकाळी ६ वाजतापासून तीन गेट ५ से.मी. उघडण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील जलाशयातून पाणी सोडले जात असल्याने सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासून तर कुठे दुपारपासून संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतीचेही कामे थांबली असून नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here