
वर्धा : जिल्ह्यात गांजा तस्करी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत २० किलो गांजा, मोबाईल, सुटकेसेसह तब्बल ५ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी कारसह पसार झाला आहे. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
स्थानीय गुन्हे शाखेचे पथक ४ जुलै रोजी वर्धा शहर परिसरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही इसम गांजासह वर्धा रेल्वे स्टेशन जवळ व्यवहारासाठी येणार आहेत. त्यानुसार पथकाने दयासागर अंडा स्टॉलजवळ सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी संशयित इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी ओडिसा येथून रेल्वेने दोन सुटकेसमध्ये गांजा आणल्याचे उघड झाले.
पोलिसांनी सुरज शंकरसिंग चव्हाण (२७, रा. चंद्रपूर), विजय नामदेराव दुधकवरे (३३, रा. आर्वी नाका वर्धा) व यश सुरेश बेमाल (२८, रा. सावंगी मेघे) यांना ताब्यात घेतले. त्यांचे सांगण्यावरून ओडिसा येथील मदन नावाच्या इसमाकडून गांजा विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. मात्र याच प्रकरणातील अमिर नाशिर खान पठान (रा. आर्वी नाका वर्धा) हा पोलीसांची चाहूल लागताच मारुती स्विफ्ट कारसह पळून गेला. तिन्ही आरोपींच्या ताब्यातून निव्वळ २०.१११ किलो गांजा (किंमत ४ लाख २ हजार), आयफोन व अन्य मोबाईल्स, दोन सुटकेस अशा एकूण ५ लाख ३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.
कारवाईत पोलीसांचा सक्रिय सहभाग…
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, बालाजी लालपालवाले, पो. अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक (स्थानीय गुन्हे शाखा) तसेच फॉरेन्सिक विभागाचे अनिल साटोणे, अजित धांदरे, मंगेश धामंदे यांनी केली.


















































