


वर्धा : पावसाळ्याच्या आगमनाने सापांचे हाल सुरू झाले असून, आपल्या बिळांत पाणी गेल्यामुळे ते नवे निवासस्थान शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. या काळात बेडूक व विविध किटकही मोठ्या प्रमाणात बाहेर येतात. परिणामी साप हे त्यांच्या खाद्याचा शोध घेत फिरताना आपल्यालाही दिसतात. अशा वेळी नागरिकांनी घाबरू नये, साप दिसल्यास तातडीने सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहन विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक व सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांनी केले आहे.
भय नको, सावधगिरी आवश्यक…
सुरकार म्हणाले की, “साप सहजासहजी कुणाला चावत नाहीत. मात्र आपण घाईघाईने हात-पाय कुठेही टाकल्यास किंवा साप असण्याची शक्यता असतानाही दुर्लक्ष केल्यास सर्पदंश होऊ शकतो. त्यामुळे घराच्या आजूबाजूला, अंगणात किंवा ओलसर जागी काळजीपूर्वक चालावे.”
सर्पदंशाची लक्षणे ओळखा…
विषारी साप चावल्यास चावलेल्या ठिकाणी दुखणे, सूज येणे, तीव्र वेदना होणे, बोलता न येणे, लाळ गळणे, हृदयाचे ठोके वाढणे, नाडी मंद होणे, थुंकताना रक्त येणे, तसेच लघवी, शौच, नाक, कान वा तोंडातून रक्त येणे अशी लक्षणे दिसतात. अशा वेळी त्वरित सरकारी रुग्णालय, सेवाग्राम वा सावंगी मेघे येथील रुग्णालयात जावे. इतर कोणत्याही ठिकाणी वेळ न घालवता सरळ उपचारासाठी जाणे महत्त्वाचे आहे.
सर्पमित्रांची मदत घ्या
साप दिसल्यास खालील अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधावा :
अभिनव : 7387423507
वैष्णव : 8600564098
महेश : 8600857912
कार्यालय : 9404891722
“साप हा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याची अनावश्यक भीती बाळगू नये. सावध राहा व योग्य वेळी सर्पमित्रांकडून मदत घ्या,” असे आवाहनही सुरकार यांनी केले.