

वर्धा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान रविवारी (ता. ४) सायंकाळच्या सुमारास सेलू तालुक्यातील काही गावांवर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यांसह आलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अक्षरशः तीन तेरा वाजवले. उन्हाळी हंगामातील पिके, फळबागा तसेच भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
वर्धा तालुक्यातील पवनार तसेच सेलू तालुक्यातील सुरगाव, कान्हापूर, रेहकी, गोंदापूर, मोर्चापूर आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी सुमारे अर्धा तास अविरत पाऊस झाला. सोबतच बारिक व मध्यम आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. अचानक आलेल्या वादळ व पावसामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. आभाळ भरून आले, वाऱ्याचा वेग वाढला आणि काही क्षणातच गारांचा मारा सुरू झाला.
या वादळी पावसाने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. सध्या शेतामध्ये तीळ, भूईमूग, भाजीपाला, वैरण पिके तसेच पपई, केळीसारख्या फळबागा बहरात आहेत. मात्र या गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला झाडांवरून झडून पडला, फळबागांमधील केळीचे घड खाली कोसळले, पपईवर गारांचा तडाखा बसून त्याचे व्यापारी मूल्य घटले. काही ठिकाणी नांगरणी करून तयार केलेल्या सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पिकांच्या मुळांना घुसमट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.