पवनार गावात डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग सतर्क ; घरोघरी तपासणी व जनजागृती

पवनार : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय इंगळे यांच्या नेतृत्वात डेंग्यू प्रतिबंधक मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत आरोग्य सेवक आनंद पिल्लारे व अंगणवाडी सेविका वाघमारे यांनी गावात घरोघरी जाऊन पाण्याचे साठे, विशेषतः कुलरचे टॉप, ड्रम, बादल्या व रंगाचे डबे यांची तपासणी केली. सर्वत्र पाण्याच्या साठ्यामध्ये डासांची पैदास होण्याची शक्यता पाहता, नागरिकांना दर दोन दिवसांनी पाणी बदलण्याचे व ड्रम पूर्ण रिकामे करून व कोरडे करूनच पुन्हा पाणी भरण्याचे आवाहन करण्यात आले.

तपासणीदरम्यान अनेक घरांमध्ये कुलर व ड्रममध्ये पाणी साचलेले आढळून आले. काही ठिकाणी डासांचे अळ्या देखील सापडल्याचे पिल्लारे यांनी सांगितले. यावेळी डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले. गावकऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढावी, यासाठी आशा सेविका कामडी यांनी महिलांशी संवाद साधून डेंग्यूपासून बचावाचे उपाय समजावून सांगितले. ही मोहीम फक्त डेंग्यूविरोधीच नव्हे, तर ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकतेचा एक सकारात्मक टप्पा ठरत आहे. “डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. आरोग्य विभाग आपलं काम करत आहे, पण घरी स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असं मत समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय इंगळे यांनी बोलताना व्यक्त केलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here