
वर्धा : भरधाव कारच्या स्टेअरिंगवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याकडेला उतरून समोरील करंजच्या झाडावर जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कार चकनाचूर झाली असून कारमधील दोघां जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आमला गावानजीक २४ जून रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास झाला. अक्षय कावलेकर (३२, रा. वायफड), नामदार पठाण (३५, रा. दहेगाव मिस्कीन) अशी मृतांची नावे असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.
अक्षय कावलेकर आणि नामदार पठाण हे दोघेही मित्र होते. एम.एच. ३२ वाय. १५८१ क्रमांकाच्या कारने दोघेही आमला गावातून बसस्थानकासमोरील रस्त्याने कावलेकर हा कार चालवित होता. मात्र, भरधाव कारच्या स्टेअरिंगवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याकडेला खाली उतरून समोरील करंजच्या झाडावर जाऊन धडकली. यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला. तर कारमधील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच गावातिल नागरिकांनी धाव घेत मृतांना कारबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. याची माहिती सावंगी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी भेट देत पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावंगी रुग्णालयात पाठविले. सावंगी पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद घेतली.




















































