
वर्धा : मित्राचा वाढदिवस असल्याने पार्टीला गेलेल्या सहायक पोलीस फौजदाराचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. ही घटना १२ रोजी मध्यरात्री १२.५३ मिनिटांच्या सुमारास हिंदी विश्वविद्यालयासमोरील उड्डणपुलाच्या खाली सर्विस रोडवर घडली. मात्र, त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी दिसून न आल्याने त्यांचा अपघात की घातपात झाला, याबाबतची चौकशी वरिष्ठ पोलिसांकडून सुरू असून मर्ग दाखल केल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. विजय ज्ञानेश्वर हातेकर (५५) रा. गौरीनगर, सावंगी मेघे, असे मृतक सहायक फौजदाराचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक विजय हातेकर हे माजी जि. प. सदस्याच्या वाढदिवसानिमित्त अरविंद मेहरा यांच्या मालकीच्या हिंदी विश्वविद्यालयाच्या बाजूला असलेल्या हॉटेल पॅराडाईज येथे एकटेच एम.एच. ३२ ए. ए.२६८४ क्रमांकाच्या दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री १२.३७ वाजताच्या सुमारास विजय यांनी त्यांच्या मुलाला फोन करून घ्यायला येण्यासाठी बोलाविले. मुलगा प्रकाश आणि त्याचा मोठा भाऊ हे दोघे चारचाकीने विजय हातेकर यांना घेण्यासाठी निघाले. पुन्हा काही वेळाने विजयने फोन करून घेण्यासाठी बोलाविले. ते बायपास रस्त्यावर दिसले नसल्याने प्रकाशने वडिलांना फोन केला असता त्यांचा फोन बंद येत होता.
विजयची मुले उड्डाणपुलाखालील सर्विस रस्त्याने त्यांना शोधात गेली असता विजय हातेकर हे रस्त्यालगत असलेल्या सिमेंट नालीवर निपचित पडून असलेले दिसले. त्यांच्या हनुवटीला, उजव्या गालाजवळ, डाव्या डोळ्याखाली, छातीवर खरचटल्याच्या जखमा दिसून आल्या. दोन्ही मुलांनी त्यांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विजय हातेकर यांची मोटरसायकल व मोबाइल त्यांच्याजवळ न दिसल्याने हा अपघात की घातपात, याबाबतचा तपास वरिष्ठ पोलिसांकडून केला जात आहे.


















































