
सेलू : तालुक्यातील बोरधरण येथे रस्त्यावर उभे असलेळे वाहन बाजूलाकरण्याच्या कारणातून पर्यटकांच्या दोन गटात शुक्रवारी सायंकाळी तुफान राडा झाला. यात एका वाहनचालकाने छातीवर चाकूने वार केल्याने टाकळघाट येथील पर्यटकाचा मृत्यू झाला. नीलेश लक्ष्मण लाजूरकर (36) असे मृतकाचे नाव आहे.
टाकळघाट बुट्टीबोरी येथील नऊ मित्र शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास तीन वाहनांनी बोरधरण येथे पर्यटनासाठी आले होते. यात आशीष लक्ष्मण लाजूरकर, वेदनारायण मोरवाळ, मोहन जिल्हारे, चंद्रशेखर कावळे, दिलावर कावळे, रवींद्र कावळे, अभय बलविर, रबी पांगुळ, नीलेश लाजूरकर या नऊ जणांचा समावेश होता. त्यांनी आपल्या सोबत स्वंयपाकाचे साहित्य देखील आणले होते. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर सगळ्यांनी जलाशयाच्या काठावरचं जेवण केले आणि गप्पा-गोष्टीत दंग झाले. दरम्यान, त्यांची वाहने जलाशया शेजारीच असलेल्या रस्त्यावर उभी होती. त्या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता एम.एच.31 एफ.ए.0052 क्रमांकाचे सेलोरो वाहन आले. त्यात वाहनचालकासह चार जणांचा समावेश होता.
यावेळी चंद्रशेखर कावळे यांची गाडी थोडी रस्त्यामधोमध उभी होती. सदर वाहनचालकाने जोरजोरात हॉर्न वाजविल्याने सगळे मित्र गाडीजवळ आले. सगळ्यांनीच गाडी निघून जाते असे सेलोरा वाहनाच्या चालकास सांगितले. यादरम्यान असलेल्या वाहनावर थापा मारायला सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि प्रकरण हातपाईवर आले. कसेबसे सेलोरो वाहन काढून देखील देण्यात आले. परंतु, अचानक वाहनाच्या चालकाने धारदार चाकू आणला आणि नीलेश लाजूरकर यांच्या छातीवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ बुट्टीबोरी येथील माया हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी नीलेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले.



















































