

वर्धा : शहरात अनेक चौकात ऑरटोरिक्षांमध्ये तीनपेक्षा जास्त प्रवासी बसवून जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे चित्र आहे; मात्र वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाकडून अशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, चार महिन्यांत १३३ ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई करीत तब्बल २० हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून सर्रास जीव धोक्यात घालून तीन पेक्षा जास्त प्रवासी बसतून वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. बजाज चौक, शिवाजी चौक, आर्वींनाका परिसर, पोस्ट ऑफिस चौक आदी परिसरात हा प्रकार दिसून येत आहे. अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जाते; पण पुन्हा हा प्रकार राजरोस सुरूच राहतो, त्यामुळे अवघ्या २० रुपयांसाठी एक हजार रुपयांचा दंड परवडेल का भाऊ, असा प्रश्न उपस्थित होत असून, ऑटोचालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे.