

आर्वी : लग्नाचे पाहुणे घेऊन आर्वीच्या दिशेने येत असलेला मालवाहू अनियंत्रित होत उलटला. या अपघातात एकूण १७ प्रवासी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी सांगितले. हा अपघात शनिवारी सकाळी आर्वी मार्गावर झाला असून प्रेमसिंग जाधव असे मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.
आर्वी तालुक्यातील पाचोड येथील भागचंद पवार यांच्या मुलीचा विवाह आर्वीत आयोजित असल्याने लग्नाचे पाहुणे घेऊन एम. एच. ४०/४१४८ क्रमांकाचा मालवाहू आर्वीच्या दिशेने जात होता. भरधाव मालवाहू आर्वी मार्गावरील वाढोणा घाट परिसरात आला असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वाहन उलटले. यात वाहनातील यशोदा पवार, अनिल राठोड, भवरी राठोड, प्रीतम नंदू जाधव, कमलनाथ जाधव, प्रेमसिंग जाधव, गायत्री किसन जाधव, अर्जुन जाधव, अंजली राठोड, चंचल जाधव, कल्पना राठोड, राजेश जाधव, समुद्र रुमाल जाधव, लखन रामू चव्हाण, वासुदेव चव्हाण, गुणवंत जाधव, सिद्धांत जाधव, सुमन माणिक राठोड हे जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना आर्वी येथील रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींपैकी चौघांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.