कार अनियंत्रित झाली अन् तिघांच्या आयुष्याची दोरी तुटली! जात होते पंचमढीला महादेवाच्या दर्शनाला; एक युवक सुदैवाने बचावला

वर्धा : महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेशातील पंचमढी येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा अपघात झाल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला; तर सुदैवाने एका युवकाचा जीव वाचला. हा अपघात २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास पंचमढीपूर्वी येणाऱ्या वळण रस्त्यावर झाला. तुषार ज्ञानेश्वर झामडे (वय ३०, रा. आबाद किन्ही), दीपक भाऊराव डाखोरे (३०, रा. आष्टी शहीद), अक्षय गौरखेडे (२६, रा. तिवसा, जि. अमरावती) अशी मृतकांची नावे आहेत; अक्षय कोडापे हा मात्र सुदैवाने बचावला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तुषार झामडे याने कारने पंचमढी येथे महादेवाच्या दर्शनाला जाण्याचा कार्यक्रम ठरविला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तुषार त्याचा आतेभाऊ अक्षय गौरखेडे (रा. तिवसा), मित्र दीपक डाखोडे (रा. आष्टी), अक्षय कोडापे (रा. आबाद किन्ही) हे चौघेही पंचमढीसाठी रवाना झाले. १६० किमी अंतर पार केल्यानंतर चौघांनी जेवण केले. त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली. मात्र, पंचमढीच्या अलीकडेच एका वळण मार्गावर कार अनियंत्रित झाली आणि सिमेंटच्या भिंतीवर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता, की कारने चार पलट्या खाल्ल्या. कारचे दरवाजे उघडून दोघेजण बाहेर पडले; तर दोघेजण आतच दबले गेले. अक्षयने स्वत:ला सावरत मध्यरात्री नातेवाइकांना फोनवरून अपघाताची माहिती दिली.

माहिती मिळताच तुषारचे बाबा व नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले. मध्यप्रदेश पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर तिघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास मृतदेह आष्टी शहरात आणण्यात आले. तुषार झामडे याचा मृतदेह आबाद किन्ही, अक्षय गौरखेडे याचा मृतदेह तिवसा (जि. अमरावती), तर दीपक डाखोरे याचा मृतदेह आष्टी येथे त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here