जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता तातडीने कागदपत्रांची पूर्तता करा! उपायुक्तांचे अर्जदारांना आवाहन; २५ फेबुवारीपर्यंत दिली मुदत

वर्धा : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये १२वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थी, व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थी, सेवा व निवडणूक विषयक ज्या अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रकरण सादर केले आहे; परंतु त्यांच्या प्रकरणामध्ये अपूर्ण कागदपत्र असल्याने प्रकरण समिती स्तरावरून रद्द केले आहे, अशा अर्जदारांनी आक्षेपित प्रकरणातील त्रुटींची २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्‍त तथा सदस्य एस. एच. चव्हाण यांनी केले आहे.

यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी जो ई-मेल आयडी अर्जात नमूद केला आहे, त्या ई-मेलवर प्रकरणास काय आक्षेप आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आक्षेपाची पूर्तता ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करून घ्यावी. जेणेकरून या प्रकरणावर समितीस कार्यवाही करणे सोईचे होऊन प्रकरणे तत्काळ निकाली काढता येईल. ज्या अर्जदारांनी समितीकडे अर्ज सादर केला; परंतु अद्यापपर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. तसेच त्यांना आक्षेपासंबंधित संदेश किंवा ई-मेल प्राप्त झाला नाही, अशा अर्जदारांनी संबंधित समितीकडे भेट द्यावी. या प्रकरणात काही आक्षेप असल्यास आक्षेपाची पूर्तता तत्काळ करावी.

जे अर्जदार २५ फेब्रुवारीपर्यंत आक्षेपाची पूर्तता करणार नाहीत, अशा अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे ग्रुहीत धरून संबंधितांचे अर्ज नस्तीबंद करून परत करण्यात येईल. याची अर्जदारांनी नोंद घेण्यात यावी, असे जात प्रमाणपत्र समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदारांना दुर्लक्ष न करता इमेल आयडी तपासून २५ फेब्रुवारीपर्यंत असलेल्या त्रुटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here