

तळेगाव (श्या.पंत.) : कुरिअर कंपनीचा माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याने दुभाजकांवरील लोखंडी कठड्याला जबर धडक दिली. यात समोरील दोन्ही चाके तुटल्याने ट्रक पलटी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी १ वाजता दरम्यान चिस्तुरजवळील एका ढाब्यासमोर झाला.
विनोद बोटरे, रा. वडधामना असे ट्रकचालकाचे नाव असून तो किरकोळ जखमी झाला. चालक विनोद हा एम.एच.४० एन.२७९९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये कुरिअर कंपनीचा माल घेऊन नागपूरकडून अमरावतीकडे जात होता. त्याने मद्यप्राशन केले असल्याने त्याचे चिस्तुरनजीक भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक महामार्गावरील दुभाजकाच्या लोखंडी कठड्याला धडकताच समोरील दोन्ही चाके तुटून ट्रक पलटी झाला.
ट्रकमधील साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले होते. त्यामुळे वाहतूकही प्रभावित झाली होती. तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पवनराज भांबुरकर, आशिष नेहारे, राहुल अमुने व रोशन करलुके करीत आहेत.