आता आठ ठिकाणी मिळणार १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना व्हॅक्सिन! राज्य शासनाकडून कोव्हॅक्सिनचे मिळाले आठ हजार डोस

वर्धा : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना २ मे रोजीपासून कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे. पाच केंद्रांवरून सध्या या लाभार्थ्यांना कोविडची व्हॅक्सिन दिली जात असून, राज्य शासनाकडून गुरुवारी कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस मिळाल्याने तीन केंद्रांची वाढ करण्यात येणार आहे.

वर्धा शहरातील महात्मा गांधी लेप्रसी फाऊंडेशन, हिंगणघाट येथील टाकाग्राऊंड उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, ग्रामीण रुग्णालय पुलगाव तसेच ग्रामीण रुग्णालय कारंजा (घा.) या केंद्रांवरून सध्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जात आहे. सदर वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्यासाठी सुरुवातीला राज्य शासनाकडून वर्धा जिल्ह्याला कोविशिल्ड या लसीचे पाच हजार डोस देण्यात आले होते. तर गुरुवारी याच वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र नाहीत, त्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात येत्या काही तासात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आरोग्य विभागाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठकही पार पडल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

प्रत्येक केंद्राला प्रतिदिवशी शंभरचे उद्दिष्ट

ऑनलाईन नोंदणी करून लस घेण्याबाबत शेड्यूल घेतलेल्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यालाच कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर प्रतिदिवशी केवळ शंभर व्यक्तींनाच कोविडची व्हॅक्सिन दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here