Home ◼️ संपादकीय नागपूरच्या मैदानावर वर्ध्याचा डंका ; सेपक टकरॉमध्ये सुवर्ण झेप

नागपूरच्या मैदानावर वर्ध्याचा डंका ; सेपक टकरॉमध्ये सुवर्ण झेप

वर्धा : क्रीडा क्षेत्रात वर्धा जिल्ह्याच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या मेहनतीचा ठसा उमटवला आहे. नागपूर येथील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या इंडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या ३६ व्या सिनिअर आणि २७ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत वर्धा जिल्ह्याच्या संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र सेपक टकरॉ असोसिएशनच्या सहकार्याने नागपूर जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील २० पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदविला होता.

सिनिअर पुरुष गटातील सामन्यांमध्ये वर्धा संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व राखले. टिम इव्हेंट आणि रेगु इव्हेंट या दोन्ही प्रकारांमध्ये वर्धा संघाने सुवर्णपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले. उपांत्यपूर्व फेरीत वर्ध्याने गोंदिया संघाचा २-० अशा फरकाने पराभव केला, तर उपांत्य फेरीत नांदेड संघावर २-० अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात वर्धा संघासमोर यजमान नागपूर संघाचे आव्हान होते. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या नागपूर संघाला वर्ध्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, अचूक डावपेच आणि आक्रमक खेळाच्या जोरावर पराभूत केले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात विजय मिळवत वर्ध्याच्या संघाने अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

ज्युनिअर गटातील मुलांनीही आपल्या कौशल्याची छाप पाडत वर्धा जिल्ह्याच्या यशात भर घातली. ज्युनिअर मुलांच्या संघाने रेगु इव्हेंट आणि क्वाड इव्हेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक मिळविले. तर सिनिअर महिला संघाने टिम इव्हेंट आणि रेगु इव्हेंटमध्ये तृतीय क्रमांक पटकावत ब्रॉन्झ पदकाची कमाई केली. ज्युनिअर मुलींच्या संघानेही टिम इव्हेंट आणि रेगु इव्हेंटमध्ये तिसरा क्रमांक मिळवत जिल्ह्याचे नाव उंचावले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडूंनी अवधेश क्रीडा मंडळाचे सचिव डॉ. विनय मून यांचे आभार मानले. योग्य मार्गदर्शन, सराव आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे वर्धा जिल्ह्याला राज्यस्तरावर यश मिळत असल्याची भावना क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.

विजयी खेळाडूंचे डॉ. विनय मून, माजी कबड्डीपटू दिवाकरराव मून, सुनील ढाले, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. नरेश कवाडे, डॉ. रवींद्र थूल, डॉ. प्रमोद नारायणे, डॉ. बुद्धघोष लोहकरे, एकनाथ मुरकुटे, दर्शन हस्ती, सोनाली भारोटे, गणेश तिमांडे, अविका मून, निखिल पोहणकर, माेसिम शेख आणि अनुप पहाडे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!