Home ◼️ संपादकीय हिंदी विद्यापीठात रक्तदानाचा सामाजिक संकल्प ; जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

हिंदी विद्यापीठात रक्तदानाचा सामाजिक संकल्प ; जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

वर्धा : मानवतेच्या सेवेसाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या धन्वंतरी रुग्णालयात मंगळवारी (१६ जून) आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रो. अवधेश कुमार यांच्या हस्ते रिबन कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव कादर नवाज खान यांनी उपस्थितांना रक्तदानाची शपथ दिली. जागतिक रक्तदाता दिन २०२६ ची संकल्पना ‘मानवतेचा एक थेंब. रक्तदान करा. जीवन वाचवा.’ या संदेशातून रक्तदानाची गरज आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.

शिबिरात विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेंद्र गादेवार, भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एच. ए. हुनगुंद यांच्यासह अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांना अभिनंदन पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. समाजातील प्रत्येक घटकाने रक्तदानाच्या चळवळीत सहभागी होणे गरजेचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा यांच्या वतीने शिबिरात रक्तसंकलन करण्यात आले.

या शिबिरात डॉ. चैतन्या पालेकर, प्रवीण गावंडे, वैशाली जगताप, गणेश्री लांजेवार, अंकुश कंचनपुरे आणि किशोर महाजन यांनी रक्तसंकलनासाठी सहकार्य केले. यावेळी सहायक कुलसचिव विनोद वैद्य, हिंदी अधिकारी राजेश यादव, धन्वंतरी रुग्णालयाचे डॉ. हेमंत धामट, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!