Home ◼️ संपादकीय सेलूत दारू तस्करांवर एलसीबीचा घाव ; २० लाखांचा मुद्देमाल जप्त! तिघांवर गुन्हे...

सेलूत दारू तस्करांवर एलसीबीचा घाव ; २० लाखांचा मुद्देमाल जप्त! तिघांवर गुन्हे दाखल

वर्धा : अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात वर्धा पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाया करत मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत स्कॉर्पिओ व अल्टो कारसह तब्बल १९ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन जणांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान १५ जून रोजी पथकाला सेलू परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दंढारे टी-पॉईंट, सेलू येथे सापळा रचला. यावेळी स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच ४६ एएल ५६६४ थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये तेजस राजेंद्र मांढरे आणि प्रणय मारुती डुकरे (दोन्ही रा. सेलू) हे मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आले.

वाहनाच्या तपासणीत ३० खरर्ड्याच्या खोक्यांमध्ये विदेशी दारू तसेच एका खोक्यात बिअरचा साठा आढळून आला. पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनासह विदेशी दारू आणि बिअर असा एकूण १७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुसरी कारवाई करत सेलू येथील वाहतपूर वार्ड क्रमांक ३ परिसरात सुलभ ज्ञानेश्वर डायगव्हाणे (वय ३० वर्षे) याला अल्टो कारमधून देशी दारूची वाहतूक करताना पकडले. त्याच्याकडून दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवलेल्या २०० देशी दारूच्या बाटल्या व अल्टो कार असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १९ लाख ८२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, आरोपींविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात पोलिसांची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!