Home ◼️ संपादकीय ऐतिहासिक पवनारच्या टेकड्यांना अतिक्रमणाचा विळखा ; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा ! दफन विधीसाठी...

ऐतिहासिक पवनारच्या टेकड्यांना अतिक्रमणाचा विळखा ; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा ! दफन विधीसाठी आरक्षित जागाही धोक्यात

पवनार : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पवनार गावातील सार्वजनिक संपत्ती आणि आरक्षित जागांवर अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावाच्या चारही बाजूंनी असलेल्या टेकड्या आणि स्मशानभूमीलगत दफन विधीसाठी राखीव असलेल्या जागेवरही अतिक्रमण होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून, ग्रामपंचायत प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

गावाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन राखीव ठेवण्यात आलेल्या सार्वजनिक जागांचे अस्तित्वच धोक्यात येत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पवनारमधील वार्ड क्रमांक ६ येथील स्मशानभूमीलगत दफन विधीसाठी राखीव जागेवर काही व्यक्तींकडून अतिक्रमण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

इतकेच नाही तर गावाच्या चारही बाजूंनी असलेल्या टेकड्यांवरही अतिक्रमणाचा डोंगर उभा राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने टेकड्यांचे सपाटीकरण करून जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले असून, काही भागात तारांचे कुंपण उभारून फॉर्म हाऊस तयार करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

आज टेकड्या वाचवल्या नाहीत तर उद्या गावाची ओळखच हरवेल अशी चिंता व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाला जागे केले आहे. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जागांवर अतिक्रमण झाल्यास भविष्यात धार्मिक, सामाजिक आणि गाव विकासाच्या कामांसाठी जागेची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पवनार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देत आरक्षित जागेची तात्काळ मोजणी व सीमांकन करण्याची मागणी केली. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावून कायदेशीर कारवाई करावी आणि भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षण कुंपण उभारावे, अशी मागणी करण्यात आली.

ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान वाढत्या अतिक्रमणाबाबत प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. टेकडी परिसरालगत असलेल्या शेतजमिनींची मोजणी करून हद्दीबाहेर अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी पवनार ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री. राऊत, प्रशासक शालिनी आदमाने, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, प्रशासक समिती सदस्य राम मगर, राहुल पाटणकर, राजू बावणे, मोरेश्वर हूलके, शकुंतला नगराळे, रोशनी अवचट, प्रमोद सरोदे, ग्रामपंचायतचे कर्मचारी राजेंद्र उराडे देविदास गुरनुले, शुभम उराडे, सामाजिक कार्यकर्ते विजय बेंडे, रणजीत धोंगडे, सोनू मुंगले, शेखर लोखंडे, विठ्ठल पडघान यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!