
राहुल खोब्रागडे
पवनार : गावाच्या टेकडीवर वसलेला हजरत सय्यद अहमद कबीर यांचा दर्गा हा परिसरातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचे जिवंत प्रतीक मानला जातो. या दर्ग्याचे बांधकाम नेमके कधी झाले किंवा त्याचा कालखंड कोणता, यासंबंधी कोणतीही ठोस ऐतिहासिक नोंद उपलब्ध नसली तरी लोकश्रद्धा, परंपरा आणि सामाजिक सलोखा यांच्या आधारे हे स्थळ अनेक दशकांपासून अस्तित्वात असल्याचे स्थानिक ग्रामस्थ आणि अभ्यासक सांगतात.
दर्ग्याच्या उभारणीसंदर्भात कोणताही शिलालेख, अधिकृत दस्तऐवज किंवा शासकीय नोंद आढळून येत नाही. तरीही पिढ्यान्पिढ्या चालत आलेली मौखिक परंपरा आणि येथे सातत्याने होणारी धार्मिक उपस्थिती या स्थळाच्या महत्त्वाची साक्ष देतात. इतिहासाच्या लिखित पानांवर नोंद नसली, तरी समाजाच्या सामूहिक स्मृतीत या दर्ग्याचे स्थान खोलवर रुजलेले आहे. या दर्ग्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे धर्मभेद न मानता सर्व समाजातील भाविक श्रद्धेने येतात. मुस्लिम बांधवांसोबतच हिंदू समाजातील नागरिकही मोठ्या आस्थेने येथे भेट देतात. चादर अर्पण करणे, दिवा लावणे, नवस बोलणे आणि नवस फेडणे अशा परंपरा येथे आजही जपल्या जातात. या धार्मिक प्रथा कोणत्याही एका धर्मापुरत्या मर्यादित नसून, सर्व समाजातील लोक त्यात सहभागी होत असल्याचे चित्र येथे दिसते.
वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. गावातील तसेच परिसरातील अनेक कुटुंबे विविध प्रसंगी या दर्ग्यावर येऊन दर्शन घेतात. काहीजण नवस बोलतात, तर काहीजण नवस पूर्ण झाल्यानंतर कुटुंबासह येथे येऊन प्रार्थना करतात. त्यामुळे हा दर्गा केवळ धार्मिक श्रद्धेचा केंद्रबिंदू नसून सामाजिक बंधुभाव जपणारे स्थळ ठरले आहे. सध्याच्या काळात समाजात धार्मिक तणावाच्या घटना घडत असताना, पवनारचा हा दर्गा मात्र वेगळा संदेश देताना दिसतो. येथे कोणत्याही धर्माचा आग्रह नसून माणुसकीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे हा दर्गा केवळ एक धार्मिक स्थळ न राहता सामाजिक समतेचे, सलोख्याचे आणि बंधुत्वाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
दर्ग्याच्या इतिहासाची ठोस माहिती उपलब्ध नसणे ही बाब अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणी, मौखिक इतिहास, जुन्या नोंदी तसेच इतिहास व पुरातत्त्व अभ्यासकांच्या संशोधनातून या स्थळाचा कालानुक्रम उलगडण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याचबरोबर दर्ग्याच्या परिसराचे जतन, स्वच्छता आणि संवर्धन करण्याची सामूहिक जबाबदारीही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. पवनारच्या टेकडीवरील हजरत सय्यद अहमद कबीर यांचा दर्गा आजही समाजाला एक मूक संदेश देत आहे. धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच असते. त्यामुळेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शांततेचा आणि ऐक्याचा अनुभव मिळतो.
समाजाने घ्यावा असा संदेश…
पवनार येथील हजरत सय्यद अहमद कबीर दर्गा आजच्या समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो. इतिहासाची लेखी नोंद नसली, तरी लोकांच्या श्रद्धेत आणि आचरणात हे स्थळ दृढपणे रुजलेले आहे. येथे हिंदू–मुस्लिम भाविक एकत्र येऊन श्रद्धा व्यक्त करतात. धर्माच्या नावावर भिंती उभारण्याऐवजी संवाद आणि परस्पर आदर वाढवला पाहिजे, हा संदेश या दर्ग्याच्या वातावरणातून अनुभवायला मिळतो. समाजातील सलोखा आणि बंधुत्व टिकवण्यासाठी अशा स्थळांचे महत्त्व अधोरेखित होते.
प्रतिक्रिया…
पवनार येथील हजरत सय्यद अहमद कबीर दर्ग्याबाबत लेखी ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नसल्या, तरी अशा स्थळांचा अभ्यास करताना मौखिक परंपरा, लोकश्रद्धा आणि स्थानिक सामाजिक संदर्भ यांना तितकेच महत्त्व द्यावे लागते. अनेकदा ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे ही लिखित इतिहासापेक्षा लोकस्मृतीत अधिक जिवंत राहतात, आणि त्यातूनच त्या ठिकाणचा खरा सामाजिक इतिहास उलगडतो.
प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे, इतिहास अभ्यासक पवनार
सध्याच्या काळात समाजात निर्माण होणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दर्गा एक सकारात्मक संदेश देतो. माणुसकी आणि बंधुभाव हाच खरा धर्म आहे. पुढील काळातही या ठिकाणचा सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही दर्गा कमिटीच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता, व्यवस्थापन आणि भाविकांच्या सोयीसुविधा याकडे सातत्याने लक्ष देण्याचा प्रयत्न करीत आहो.
इंजि. अलताफ अली, अध्यक्ष हजरत सय्यद अहमद कबीर दर्गा ट्रस्ट पवनार


























































