

वर्धा : वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्ववंशी यांनी आरोपी नीतेश ज्ञानेश्वर पेंदाम (रा. सोनेगाव (आबाजी) ता. देवळी) याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
पीडिता व आरोपी हे दोघेही एकाच गावातील रहिवासी आहे. पीडितेच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच आरोपी राहत असून, ३१ जानेवारी २०१३ ला पीडिता ही सायंकाळी ७.३० वाजता दुकानातून पेनची रिफिल घेऊन घराकडे जात असताना आरोपीने तिला वाटेत अडविले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेचे तोंड हाताने घट्ट दाबत तिला कवट्यात घेत तिचा विनयभंग केला. आरोपीच्या तावडीतून पीडितेने कशी बशी सुटका केल्यावर घरी पोहोचलेल्या पीडितेने स्वत:ला सावरत तिच्यासोबत घडलेच्या प्रकाराची माहिती आईवडिलांना दिली. त्यानंतर पीडितेने देवळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार अरविंद लक्ष्मण वाघ यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. याप्रकरणी एकूण चार साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेता न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अँड. विनय आर. घुडे यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून समीर कडवे यांनी काम पाहिले.