

वर्था : वेळ. दुपारी १२.३० वाजताची..शिवाजी चौकात रस्त्यावर वाहनांची वर्दळ…अन् काही क्षणातच वाहनं थांबली..पाहतो तर काय… दोन युवकांची एकमेकांना गोटमार सुरू होती… या घटनेचा थरार नागरिकांनी डोळ्याने अनुभवला, मात्र, नागरिकांची गर्दी जमलेली पाहताच दोन्ही युवकांनी तेथून पळ काढला.
दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोन युवकांमध्ये चांगलीच फ्री स्टाईल हाणामारी झाली. एकमेकांना रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका युवकाच्या तर चक्क तोंडातून रक्ताच्या धारा निघत होत्या. हा सर्व प्रकार नागरिकांनी आपल्या डोळ्याने पाहिला, माहितीनुसार हे दोन्ही युवक एका मुलीच्या प्रकरणातून एकमेकांना मारहाण करीत असल्याची चर्चा परिसरात होती. काही वेळातच दोघांनी एकमेकांवर दगडफेक सुरु केली.
मात्र, काही सुजान नागरिकांनी युवकांना हटकले मात्र बेधुंद युवकांनी त्यांना देखील शिवीगाळ करुन हकलून लावले. काही वेळातच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमल्याने दोघांनी जखमी अवस्थेत तेथून पळ काढला. या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. युवकांची नावे कळू शकली नाही, तसेच या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद देखील घेण्यात आलेली नव्हती.