
हिंगणघाट : घर बांधकामासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी हिंगणघाट येथे आलेल्या एका ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी शासकीय रुग्णालयासमोर घडली. सुधाकर तुळशीराम वाघमारे (५८, रा. सोनेगाव कुटकी) असे मृताचे नाव आहे. सुधाकर हे घर बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करून दुचाकीने गावी परत जात होते.
त्यांच्या दुचाकीवर प्लास्टिकचे पाइप तसेच शौचालयाची सीट ठेवली होती. दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान शासकीय रुग्णालय चौकातून जात असताना उह्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तेथे त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. यादरम्यान मागून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापहून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.



























































