
वर्धा : अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने गोरस भंडारवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. ६) गांधीवादी विचारसरणीच्या मार्गाने शांततापूर्ण मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला वर्धा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहराच्या रस्त्यांवर उमटलेली नागरिकांची उपस्थिती ही गोरस भंडाराबाबत जनमानसात असलेल्या आपुलकीची आणि संवेदनशीलतेची साक्ष देणारी होती.
एफडीएच्या या कारवाईमुळे दूध उत्पादक गोपालक, रोजंदारीवर काम करणारे कामगार तसेच गोरस भंडारवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आणि चिंता स्पष्टपणे दिसून आली. कोणत्याही प्रत्यक्ष तक्रारीशिवाय इतकी मोठी कारवाई करण्यात आली आणि थेट परवाना रद्द करण्यात आला, हे सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडचे असल्याची भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. ही कारवाई अन्यायकारक व दमनकारी असल्याचे मत व्यक्त करत तिचा तोत्र निषेध करण्यात आला. या मूक मोर्चामध्ये नागरिक, शेतकरी, गौपालक, कर्मचारी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला.
यावेळी प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून गोरस भंडारला तत्काळ दूध वितरणाची परवानगी देण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी महोदया यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये वर्ध्याचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, अविनाश काकडे, धनंजय ढोमणे, विजय मोहता, प्रदीप बजाज, अमित ठाकूर, अमित देशभ्रतार, प्रवीण पेठे, नीरज गुजर, विशाल मानकर, सचिन पहाडे, सिद्धू मून, प्रफुल कुकडे, सुनील मानकर, योगेश महंतारे, समीर देशमुख, जी. वी. ठाकरे, राजीव वानखेडे, मंगेश भोसले, प्रवीण भोयर, उदय मेघे, शैठेश सिंघल, छगन बत्रा, नितीन चुडोवाले यांच्यासह अनेक मान्यवर, गौपालक, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते



























































