Home Breaking News मृत्यूशी पाच दिवस झुंज अखेर अपयशी ; सितम बोरकरची प्राणज्योत मालवली !...

मृत्यूशी पाच दिवस झुंज अखेर अपयशी ; सितम बोरकरची प्राणज्योत मालवली ! पवनार परिसरात हळहळ ; मित्रपरिवारावर शोककळा

पवनार : नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पवनारजवळील मामा-भांजा दर्गा परिसरात शुक्रवारी (ता.२२) झालेल्या भीषण साखळी अपघातातील गंभीर जखमी युवक सितम दिनकर बोरकर (वय २२, रा. पवनार) याचा उपचारादरम्यान बुधवारी (ता.२७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. सावंगी येथील रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर अपयशी ठरली. या घटनेने पवनार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवारी दुपारी मामा-भांजा दर्गा परिसरात भरधाव एसटी बसने रोड रोलरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला होता. धडक इतकी भीषण होती की रोड रोलरचे दोन तुकडे झाले होते. याचवेळी दुचाकीने पवनारकडे येत असलेला सितम बोरकर हा युवक अपघाताच्या तडाख्यात सापडला. भरधाव एसटी बसची धडक त्याच्या दुचाकीला बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली होती. सितम बोरकर याच्यासह इतर जखमींना सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आज त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातानंतर मामा-भांजा दर्गा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तातडीने वेगमर्यादा, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, सितम बोरकर यांच्या निधनाची बातमी समजताच पवनार परिसरात शोककळा पसरली असून मित्रपरिवार व नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास येथील स्थानिक स्मशानभूमीत सितम बोरकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!