
वर्धा : आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता भारतातील सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत तेल कंपन्यांनी गेल्या आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझ्लेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ सुरू ठेवली आहे. या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून महागाईचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. देशात आधी गॅस सिलिंडरच्या किमतीचा भडका उडाला.
त्यानंतर आता गेल्या १५ मेपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज सोमवारी पुन्हा पेट्रोल २ रुपये ६१ पैसे तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले. मागील ११ दिवसांच्या कालावधीत पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये जवळपास साडेसात रुपयांची वाढ झाली आहे. आणखी ही दरवाढ कुठपर्यंत जाणार याची चिंता लागली आहे. कारण पेंट्रोल- डिझेलच्या किमती वाढल्या तर सर्वच वस्तूंच्या किमती वाढून महागाईचा स्फोट झाल्याशिवाय राहत नाही, असा आतापर्यंतचा नागरिकांना आलेला अनुभव असल्याचे सांगत आहे.
शेतकर्यांच्या चिंतेत मर; ऐन हंगात मशागत महागली
सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे करत आहेत. शेतीची वाही करण्यासाठी आणि नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, डिझेलचे दर गगनाला मिडल्यामुळे ट्रॅक्टर चालकांनीही मशागतीचे भाडे वाढवले आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता पेरणीपूर्वीच शेतीसाठी अतिरिक्त आर्थिक भर्दड सहन करावा लागत आहे.

























































