
रतलाम : त्रीवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस (१२४३१) ला रविवारी पहाटे मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील अलोर परिसरात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही काळ ट्रेनमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या तातडीच्या बचाव कार्यामुळे सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीकडे जात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसला पहाटे सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास लुणी-रीछा आणि विक्रमगड रेल्वे स्थानकादरम्यान आग लागली. सुरुवातीला ही आग एसी कोच बी-१ मध्ये लागली. त्यानंतर काही वेळातच आगीने शेजारच्या आणखी दोन डब्यांना विळखा घातल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
आग लागल्याची माहिती मिळताच ट्रेनमधील हूटर वाजवण्यात आला. त्यानंतर रेल्वे कर्मचारी, आरपीएफ आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त डब्यांमधून तब्बल ६८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला असून प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला. दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून त्वरित मदत आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली. संबंधित परिसर राजस्थानमधील कोटा रेल्वे मंडळाच्या अधिकार क्षेत्रात येत असला तरी रतलाम रेल्वे मंडळाचे मुख्यालय जवळ असल्याने मंडळ व्यवस्थापक अश्विनी कुमार यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.



























































