Home जिल्हा वर्धा पवनारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिवस्मारकाचा मार्ग मोकळा ; ग्रामसभेत सर्वानुमते ठराव...

पवनारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिवस्मारकाचा मार्ग मोकळा ; ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर

पवनार : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली नितांत श्रद्धा आणि शिवस्मारक उभारणीची अनेक वर्षांची मागणी अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. पवनार येथील शिवप्रेमी नागरिकांच्या मागणीनुसार शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ग्रामपंचायत समोरील जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकासाठी देण्यात यावी, अशी मागणी सर्वानुमते मंजूर करण्यात आली.

ग्रामसभेच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे गावातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात या ठिकाणी भव्य आणि प्रेरणादायी शिवस्मारक उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे. शिवस्मारक हे केवळ स्मृतीचिन्ह नसून युवकांना प्रेरणा देणारे आणि शिवचरित्राची ओळख करून देणारे केंद्र ठरेल, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

सभेदरम्यान अनेक नागरिकांनी आपल्या भावना मांडत पवनारमध्ये शिवस्मारक उभारणे ही गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्राभिमान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मतही व्यक्त करण्यात आले.

आगामी काळात स्मारकाच्या आराखड्याबाबत चर्चा करून निधी संकलन, लोकसहभाग आणि विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समिती सक्रियपणे काम करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गावात उभारण्यात येणारे हे शिवस्मारक पवनारच्या ओळखीमध्ये नवा मानबिंदू ठरेल, अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली.

यावेळी शिवस्मारक उभारणीसाठी स्वतंत्र “शिवस्मारक समिती” गठीत करण्यात आली. समितीत माजी सरपंच गांडोळे, माजी उपसरपंच राहुल पाटणकर, श्रीकांत तोटे, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण गोमासे, सामाजिक कार्यकर्ते नितीन कवाडे, जयंत गोमासे, विशाल नगराळे, राजू बावणे, सुभाष पाटील यांच्यासह अनेक शिवप्रेमी नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!