

वर्धा : अवैध दारू वाहतुकीवर सावंगी (मेघे) पोलिसांनी धडक कारवाई करत सुमारे 1 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना मुखबिराकडून माहिती मिळाली की, हिरापूर येथील एक इसम बेकायदेशीररित्या विदेशी दारूची वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत मेघदूत अपार्टमेंटसमोर नाकाबंदी केली.
दरम्यान, संशयित दुचाकी थांबवून तपासणी केली असता, त्याच्याकडे परवाना नसताना विदेशी दारूचा साठा आढळून आला. आरोपीने आपले नाव प्रणय विशाल सुटे (वय 24, रा. सालोड) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध कंपन्यांची विदेशी दारू, अंदाजे 4,000 रुपयांचा साठा तसेच अंदाजे 1,20,000 रुपयांची बजाज कंपनीची दुचाकी असा एकूण 1,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पथकाने केली.



























































