Home ◼️ संपादकीय जिल्ह्यात एकही आमराई शिल्लक नाही ; धक्कादायक वास्तव : गावरान आंब्यांची गोडी...

जिल्ह्यात एकही आमराई शिल्लक नाही ; धक्कादायक वास्तव : गावरान आंब्यांची गोडी हरवली

राहुल खोब्रागडे

वर्धा : एप्रिल महिना उजाडताच आंब्याच्या सुगंधाने दरवळणारा ग्रामीण परिसर ही वर्धा जिल्ह्याची ओळख होती. गावोगावी, शेताशेतांमध्ये उभ्या असलेल्या दाट आमराया आणि उन्हाळ्यात त्यांच्या सावलीत विसावणारे शेतकरी, कैऱ्यांच्या गंधाने भरलेली दुपार आणि पिकलेल्या आंब्यांची गोडी हे सर्व चित्र आता भूतकाळात जमा झाले आहे. कारण, सध्या वर्धा जिल्ह्यात पारंपरिक गावरान आमराया जवळपास पूर्णपणे नामशेष झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

पूर्वी प्रत्येक गावात, प्रत्येक शेताच्या बांधावर आंब्याची मोठी झाडे हमखास आढळत. ही झाडे केवळ फळ देणारी नव्हती, तर ग्रामीण संस्कृतीचा, नातेसंबंधांचा आणि पर्यावरणाचा अविभाज्य भाग होती. उन्हाळ्याच्या कडक उन्हात शेतकऱ्यांसाठी ही झाडे सावलीची नैसर्गिक छाया ठरायची. लहान मुलांसाठी कैऱ्या तोडणे, आंबे गोळा करणे ही उन्हाळ्यातील आनंदाची परंपरा होती. मात्र गेल्या काही दशकांत या परंपरेला मोठा तडा गेला आहे. गोटी, गोधळचा, खोबऱ्या, साखऱ्या, केशन्या, दसऱ्या अशा असंख्य गावरान जातींच्या आंब्यांनी वर्धा जिल्हा समृद्ध होता. प्रत्येक जातीची चव, रंग, गंध आणि वैशिष्ट्य वेगळे असायचे. या आंब्यांमध्ये स्थानिक माती आणि हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता होती. त्यामुळे कमी देखभालीतही ही झाडे वर्षानुवर्षे भरघोस फळधारणा करत असत. मात्र आज या जातींचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे.

या बदलाचा परिणाम पर्यावरणावरही गंभीर स्वरूपात जाणवत आहे. गावरान आमराया या पक्षी, मधमाश्या, फुलपाखरे, वटवाघुळे आणि विविध कीटकांसाठी आश्रयस्थान होत्या. या झाडांच्या अभावामुळे या जीवसृष्टीची संख्या घटत असून पर्यावरणीय साखळीवर त्याचा परिणाम होत आहे. शेतांमध्ये सावली कमी झाल्याने जमिनीतील आर्द्रताही घटत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे. दरम्यान, आंबा पिकवण्याच्या पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. पूर्वी कैऱ्या नैसर्गिकरीत्या पिकवल्या जात असत. त्यातली गोडी, सुवास आणि नैसर्गिक स्वाद अतुलनीय असायचा. आता मात्र रासायनिक प्रक्रियांचा वापर वाढल्याने आंब्याच्या चवीत आणि गुणवत्तेत लक्षणीय फरक पडत आहे. “पूर्वीच्या आंब्यांची गोडी आता मिळत नाही,” अशी भावना ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी व्यक्त करताना दिसतात.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आमरायांचा पूर्णपणे लोप झाल्याचे चित्र समोर येत आहे. ही बाब केवळ शेतीपुरती मर्यादित नसून सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही चिंताजनक आहे. गावरान आमराया या ग्रामीण परंपरेचा भाग होत्या. त्या हरवल्याने एक संपूर्ण जीवनशैलीच हरवत असल्याची खंत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, उरलेल्या पारंपरिक झाडांचे जतन आणि नव्याने गावरान आमराया निर्माण करण्यासाठी तातडीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. कृषी विभाग, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र येऊन गावरान आंब्यांच्या जातींचे संवर्धन, रोपवाटिका निर्मिती आणि जनजागृती मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा, पुढील काही वर्षांत गावरान आंबा हा केवळ आठवणींमध्ये आणि कथांमध्ये उरणार असून प्रत्यक्षात त्याचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया :

तरुण पिढीमध्ये शेतीबाबत नैराश्याची भावना वाढत असून पारंपरिक पद्धतींकडे दुर्लक्ष होत आहे. वारसाहक्काने होणारे शेतीचे विभाजनही मोठे कारण ठरत आहे, त्यामुळे मोठ्या झाडांना जागा कमी पडते. तसेच आंब्याच्या झाडांमुळे माकडांचा व इतर वन्यप्राण्यांचा त्रास वाढून इतर पिकांचे नुकसान होते असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आंब्याची झाडे कापून टाकले आहे. त्यामुळे आंब्याच्या बागा नाहीश्या झाल्या आहे.

प्रशांत भोयर, अध्यक्ष कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्था वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!