


वर्धा : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि खवा विक्रेत्यांकडून होणाऱ्या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडून विशेष व्यावसायिक प्रतिष्ठाने तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांतील दुकाने आणि उत्पादन केंद्रांवर छापे टाकून मिठाई, खवा, दूधजन्य पदार्थांचे सुमारे ९० नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा आणि दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेच धोरण सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जिल्ह्यात राबविले जात आहे. सण-उत्सव सुरू होण्यापूर्वी एफडीएच्या अधिका-यांनी दुकानदार व उत्पादकांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. याच सूचनांचे पालन जिल्ह्यातील अन्न पदार्थ विक्रेत्यांकडून होत आहेत काय याची शहानिशा विशेष मोहीम राबवून केली जात आहे.
याच मोहिमेदरम्यान नियमांना बगल दिली जात असल्याचे पुढे आल्यावर तब्बल ३ अन्न पदार्थ विक्री करणा-या व्यावसायिकांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. तर अन्न पदार्थांच्या पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी आतापर्यंत प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये काही नमुने सब स्टॅन्डर म्हणजेच कमी दर्जाचे आढळले आहे. पण हे अन्न पदार्थ नागरिकांच्या सेवनायोग्य असल्याचेही पुढे आल्याने कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. पण खबरदारीच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
प्रतिक्रिया…
सणांच्या काळात मिठाई, खवा, बर्फी, दुधाचे पदार्थ यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. अशावेळी ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यासाठी एफडीए सतर्क आहे. ऑगस्टपासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ३ व्यावसायिकांचे पारवाने तात्पूर्ते निलंबित करण्यात आले आहे. ग्राहकांनीही खरेदी करताना गुणवत्तेची खात्री करून घ्यावी. तसेच शंका आल्यास संबंधित दुकानाची माहिती एफडीएला द्यावी.
प्रफुल्ल टोपले, उपायुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, वर्धा.