


वर्धा : जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. सेवाग्राम पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी मोठी कारवाई करत रेती चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह तब्बल ८ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना सावंगी (देर्डा) शिवारातील धाम नदी घाटातून काळी रेती चोरी करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मांडगावकडून मदनीकडे येणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी करण्यात आली. दरम्यान ट्रॅक्टर (क्रमांक MH 32 AS 3922) विना क्रमांक ट्रॉलीसह रेती भरून येताना पोलिसांच्या हाती लागला.
दोघांकडे शासनाचा कोणताही पास वा परवाना नसताना काळी रेती भरून वाहतूक करत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर, ट्रॉली व १ ब्रास रेती असा मिळून ₹८,०९,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक मा. सदाशिव वाघमारे व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पोलीस निरीक्षक मा. विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स. फौ. मनोज धात्रक, पो. हवा. महादेव सानप, पवन पन्नासे, विनोद कापसे या स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.