
पवनार : पैसा महत्त्वाचा नाही, त्यामागची भूमिका महत्त्वाची आहे. मी पाच लाख देत असून दरवर्षी एक लाख देत राहीन. ज्या गावात माझं जडणघडण झालं, त्या गावासाठी काहीतरी चांगल्या भावनेने करू शकलो, हेच माझं समाधान आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मदत करत राहील. विद्यार्थ्यांनो आई-वडिलांची सेवा करा, गुरुजनांचा आदर करा, अभ्यास करून खूप मोठे व्हा शिक्षणात काही अडचण आल्यास मला सांगा असे उद्गार माजी खासदार दत्ताजी मेघे यांनी पवनार येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भेटी दरम्यान आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात काढले.
यावेळी माजी सरपंच शालिनी आदमाने, सुनीता ढवळे, सामाजिक कार्यकर्ते जयंत गोमासे, गुरुदेव सेवा समितीचे नारायण गोमासे, नितीन कवाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. पवनार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दत्ताजी मेघे यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. तब्बल ८० वर्षांनंतर ते या शाळेला भेट देण्यासाठी आले. जुन्या, मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीचे दृश्य पाहून ते भावुक झाले. या शाळेच्या जागी नवी इमारत उभी राहिली पाहिजे. त्यासाठी शासनस्तरावर मी स्वतः प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या इमारतीच्या बांधकामाकरिता पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. यासोबतच शाळेच्या सातत्यपूर्ण विकासासाठी दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे वचन त्यांनी दिले. त्यांच्या या मदतीतून आधीच शाळेत संगणक टेबल, पुस्तकांसाठी आलमारी, शालेय पोषण आहाराची भांडी आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक खेळ साहित्य खरेदी करण्यात आले. याचे लोकार्पण त्यांच्या हस्तेच करण्यात आले. यावेळी उद्धवराव चंदनखेडे, गीता इखार, नलिनी ठोंबरे, विशाल नगराळे, सुरेश इखार, रणजीत भांडवलकर, राजू बावणे, शाळेच्या मुख्याध्यापिका, यामिनी जवादे, शिक्षक विशाल गावंडे, साटोने मॅडम, भोयर मॅडम, प्रशांत भोयर, अनिल बिजवार तसेच पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा श्रीमती सावंत यांची उपस्थिती होती.
बालपणीच्या आठवणींना उजाळा….
दत्ताजी मेघे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की “या शाळेत माझं बालपण गेलं. दिवंगत खासदार रामचंद्र घंगारे यांचे वडील माझे शिक्षक होते. आम्ही त्यांचा आदर करीत असू. त्यामुळे घंगारे साहेबांशी नातं आपसूकच जुळलं. आज ८० वर्षांनंतर पुन्हा या शाळेत आलो, हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे.




















































