
वर्धा : यंदाचा पावसाळा वर्धा जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे. समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम असे तब्बल सात प्रकल्पांनी शतक गाठले असून त्यापैकी पाच प्रकल्पांतून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, प्रकल्प परिसरात निसर्गरम्य धबधबे, प्रवाह, व मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांची जलाशयांकडे मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील ११ पैकी सात प्रकल्पांनी मागील वर्षाच्या सरासरीपेक्षा अधिक जलसाठ्याची नोंद झाली आहे. यामध्ये पंचधारा, पोथरा, डोंगरगाव, मदन, मदन उन्नई, धाम, लाल नाला आणि लघु प्रकल्प यांचा समावेश आहे. यापैकी पंचधारा, पोथरा, डोंगरगाव, मदन आणि वर्धा कार नदी प्रकल्प १०० टक्के क्षमतेने हाऊसफुल्ल झाले आहेत.
पावसाळ्यानंतर प्रकल्पांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे परिसरात निर्माण झालेल्या धबधब्यांचे मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे. जलाशयांच्या किनाऱ्यावर, पुलांवर, तसेच घाटांवर नागरिकांची गर्दी वाढली असून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी लोक मोठ्या संख्येने प्रकल्प परिसरात भेट देत आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सूचना व उपाययोजना केल्या असून धोकादायक ठिकाणी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
प्रकल्प जलसाठा (टक्केवारीत)
बोर प्रकल्प – ७२.५३
निम्न वर्धा – ६४.९५
धाम प्रकल्प – ८८.४२
पोथरा प्रकल्प – १००
पंचधारा प्रकल्प – १००
डोंगरगाव प्रकल्प – १००
मदन प्रकल्प – १००
लाल नाला प्रकल्प -१४.८५
वर्धा कार नदी प्रकल्प- १००
सुकळी लघु प्रकल्प – १००
यंदा भेडसावणार नाही पाणीटंचाई
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पाणीसाठ्यांची स्थिती समाधानकारक असल्यामुळे पुढील काही महिन्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही. यंदा साठलेला पुरेसा जलसाठा पावसाळ्यानंतरच्या हंगामात पिकांसाठीही दिलासा ठरणार आहे.


















































