
पवनार : विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे श्री. दत्ताजी मेघे यांनी अलीकडेच पवनार येथील विनोबा भावे यांच्या ब्रह्मविद्या मंदिर आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांचा ज्येष्ठ गांधी-विनोबा विचारक गौतमभाई बजाज यांच्यासोबत घडलेला आपुलकीचा संवाद हा या भेटीचा खास ठरला.
आश्रमात दाखल होताच दत्ताजी मेघे यांनी सर्वप्रथम गौतमभाई बजाज यांची भेट घेतली. वय नव्वदिकडे वाटचाल करत असताना आणि प्रकृतीत बिघाड असताना अद्यापही विनोबांच्या विचारांचा प्रसार करत राहिलेले गौतमभाई यांना पाहून दत्ताजींनी त्यांच्या तब्येतीची सविस्तर विचारपूस केली. यावेळी दोघांमध्ये गांधी-विनोबा तत्त्वज्ञान, आजच्या समाजातील बदलत्या प्रवृत्ती, शिक्षण व ग्रामविकासाच्या संकल्पना यावर उत्स्फूर्त चर्चा झाली.
या चर्चेत ग्रामीण भागातील शिक्षणाची सद्यस्थिती, युवकांना रोजगाराच्या संधी, तसेच समाजात विनोबांच्या विचारांची नव्याने पेरणी कशी व्हावी याविषयी अनेक मते मांडण्यात आली. दत्ताजी मेघे यांनी आपल्या दीर्घ अनुभवाच्या आधारे ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. या भेटीप्रसंगी परिसरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयंत गोमासे, नितीन कवाडे, राहुल मेघे, अनंता साठोने, विशाल नगराळे तसेच माजी सरपंच अजय गांडोळे, शालिनीताई आदमाने यांचा विशेष समावेश होता.

















































